कोरोनामुक्त मुंबईसाठी वॉर्डनिहाय पथक – मुख्यमंत्री

0

मुंबई  ९: बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना या वॉर्डनिहाय पथकांची नोंदणी  करण्याची सूचनाही दिली.

            आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत  परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कायमस्वरूपी यंत्रणा हवी

            नागरिक आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारी स्वयंसेवी संस्थांची ही यंत्रणा कायमस्वरूपी मुंबईत कार्यरत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनात एकजुट असेल तर आपण कोरोनाचे संकट नक्कीच परतवून लावू. चेस द व्हायरस चे काम महापालिका करत आहेच, ते ज्या ठिकाणी काम करत आहेत ती ठिकाणे सोडून इतर ठिकाणी चेस द व्हायरस ही संकल्पना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवावी व प्रत्येक वस्तीमधील नागरिकांची तपासणी केली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरवण्यात यावे.

समित्यांनी जनजागृती करावी

            एखाद्या गोष्टीवर जेव्हा जनभावना एकवटते तेव्हा निर्विवाद यश मिळतेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गावपातळीवर कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्याच्या सुचना मी दिल्या आहेत. जग, राज्य, जिल्ह्याची चिंता करण्याआधी प्रत्येक गावाने आपले गाव, घर अंगण स्वच्छ ठेवण्याचे ठरवले तरी आपण कोरोनाला आणि पावसाळ्यातील आजारांना हरवू शकू. कोरोना आणि पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या, मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सुचनांचे पालन स्वयंसेवी संस्थांनी  मुंबईतील वस्त्यांमधील लोकांकडून करून घेतले तरी आपण मुंबईला सुरक्षित ठेवू शकू. त्यादृष्टीने या संस्थांनी जनजागृती करावी असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here