नाशिक जिल्ह्यात विजेची तार तुटून दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू… बागलान तालुक्यातील घटना…

0

वेगवान न्यूज /गणेश सोनवणे

सटाणा:विजेच्या खांबावरील जीर्ण झालेली विद्युत तार  जमिनीवर तुटून पडल्याने तारेला चिटकून दोन जीवलग मित्रांचा करुण अंत झाल्याची घटना घडली. आज रविवारी (दि.18) सकाळी शहरातील न्यू प्लॉट मध्ये ही घटना उघडकीस आली.
दरम्यान वीज महावितरणाच्या गलथान कारभारामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या दोनशे ते अडीचशे नागरिकांनी दोन्ही युवकांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता.कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांनी आश्वासन दिल्यानंतर युवकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले .
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मापारी यशवंत रामभाऊ सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा ओमकार (23) व अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते संजय ह्याळीज यांचा मुलगा भूषण (24) हे दोघे जीवलग मित्र शनिवारी रात्रीच्या सुमारास न्यू प्लॉट येथील आपल्या राहत्या घराजवळील मराठी शाळेच्या इमारतीत नेहमी प्रमाणे गप्पा मारत होते .रात्री उशिरा जोरदार मुसळधार पाऊस सुरु झाल्याने ते शाळेतच अडकले .रात्री उशिरा पाऊस उघडल्यानंतर घरी येत असतांना तुटलेल्या विजेच्या तारेवर पाय पडल्याने भूषण तारेला चिटकला हे पाहून त्याला सोडण्यासाठी ओमकार गेला त्याला जबर धक्का बसला .आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास रहिवाशी बाहेर पडले असता दोघे युवक मृतावस्थेत आढळून आले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले.दरम्यान संतप्त नागरिकांनी जीर्ण झालेल्या विद्युत तारांमुळेच निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा आरोप करत कुटुंबियांना आर्थिक भरपाई मिळे पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली .येथील ग्रामीण रुग्णालयात जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली .यावेळी आमदार बोरसे यांनी कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांच्याशी संपर्क साधून विजेच्या धक्क्याने मरण पावलेल्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत सूचना केल्या .कार्यकारी अभियांना यांनी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी वीस हजार रुपये देण्यात आले.
आठ तासांनी मृतदेह घेतले ताब्यात …
मृतांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी म्हणून नागरिकांनी सहा तास ग्रामीण रुग्णालयात ठिय्या दिला.कार्यकारी अभियंता बोंडे ,उपअभियंता मधुकर बोरसे ,पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी नातेवाईकांशी चर्चा करून कंपनी मार्फत जास्तीची मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आज रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघा युवकांचे मृतदेह ताब्यात घेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here