जगाने यापेक्षाही भयंकर महामारीसाठी तयार राहायला हवं – WHO

0

जिनिव्हा l जिनिव्हा येथील एका परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेस बोलत होते. सध्या जगभरात कोरोना महामारी थैमान घालत आहे. मात्र, जगाने यापेक्षाही भयंकर महामारीसाठी तयार राहायला हवं, असं वक्तव्य टेड्रोस घेब्रेयेस यांनी केलं.देशांनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी, असंही ते म्हणाले आहेत.

मात्र, ही महामारी शेवटची नाही. यापुढे जगाला यापेक्षाही भयंकर महामारीला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा टेड्रोस यांनी दिला आहे. कोरोना महामारीपुढे सर्व देश हतबल होताना दिसत आहेत. अनेक देशांना या विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.महामारी येणे आणि जाणे हे मानवी जीवनाचा भाग असल्याचे आपल्याला इतिहासाने शिकवले आहे.

त्यामुळे पुढील महामारीसाठी आपण तयार राहायला हवं. आज आपण जितके तयार आहोत, त्यापेक्षा अधिक तयार राहायला हवं, असंही ते म्हणाले आहेत.जगभरात कोरोना महामारीने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात २.७२ कोटींपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर आतापर्यंत जगभरात ८,८८,३२६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पहिला कोरोनाबाधित रुग्ण चीनच्या वुहान प्रांतात डिसेंबर २०१९ मध्ये सापडला होता. त्यानंतर जगभरात या विषाणूने हातपाय पसरले आहेत. तेव्हापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच गेली आहे. भारतामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देशात ४२ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here