नवी दिल्ली l बाप संपत्ती मुलाच्या नावावर करत नसल्याने मुलानेच जन्मदात्या पित्याची क्रूरपणे हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बारबंकीमध्ये उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणा- या या घटने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी मुलाने वडिलांची हत्या केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण ?
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीतील फतेहपूर गावात श्रीराम गौतम (वय 55) मुलगा आणि सुनेसह राहतात. त्यांचा मुलगा मनोज संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी वडिलांच्या मागे तगादा लावत होता. मात्र, मुलाच्या नावावर संपत्ती करण्यास वडील नकार देत होते. यावरून त्यांच्यात वाद होत होते. मुलगा आणि वडिलांमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा संपत्ती नावावर करण्यावरून वाद सुरू झाला आणि तो विकोपाला गेला.
वडिलांनी मुलाच्या नावे संपत्ती करण्यास ठाम विरोध केला. त्याचा राग आल्याने मुलाने वडिलांना खेचत घराबाहेर आणले. घराबाहेर असलेल्या झाडाला त्यांना बांधले आणि पत्नीच्या मदतीने वडिलांचा गळा चिरून त्यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेने गाव हादरले आहे. गावकऱ्यांनी मनोजला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांची नजर चूकवून तो पत्नीसह फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने गावात दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरुवात करून हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. वडिलांची हत्या करणारा मनोज आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.