भायखळा l अभिनेत्री रिया चक्रवतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रियाला बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात भायखळा महिला जेलमध्ये ठेवण्यात आले. गुरुवारी रिया तिचा भाऊ शौकिकसह चार जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
नार्केटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबीने) अटक केल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आल्यानंतर एनसीबीने रियाची 20 तास चौकशी केल्यानंतर तिला मंगळवारी अटक केली.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिला न्यायालयात हजर केले. तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रात्री रियाला एनसीबीच्या कार्यालयातील महिला कक्षात ठेवण्यात आले. सुरक्षेचा विचार करता एनसीबी कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आज सकाळी रियाला पोलीस बंदोबस्तात भायखळा महिला जेलमध्ये नेले. न्यायालयीन कोठडीत असताना जो पर्यंत रियाला जामीन होत नाही तोपर्यंत तिला भायखळा जेलमध्ये राहावे लागणार आहे.ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या झैद, अब्देल परिहार, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि शौकिक चक्रवतीच्या कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी त्या चौघाना न्यायालयात हजर केले.
त्या चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. तर ड्रग्जप्रकरणी अनुज केशवाणीला एनसीबी कोठडी सुनावली आहे.