भारतात पब्जी गेम पुन्हा सुरु होणार?

0

नवी दिल्ली l केंद्र सरकारने नुकतीच ज्या 118 अॅप्सवर बंदी घातली आहे त्यात PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite या अॅप्सचा उल्लेख आहे. हे दोन्ही अॅप्स चीनी कंपन्यांनी तयार केलेले आहेत. दक्षिण कोरियाच्या कंपनीने नाही.

डेस्कटॉपरव खेळला जाणारा मूळ पबजी गेम PUBG Corporation चा आहे आणि केंद्र सरकारने त्यावर बंदी घातलेली नाही. आता या कंपनीने मोबाईल गेमची फ्रँन्चायजी चीनी कंपनीकडून काढून घेण्याचा निर्णय घेतल्याने या गेमचा भारतातला मार्ग पुन्हा सुकर होऊ शकतो.

भारतात पब्जीचा मोठा ग्राहक वर्ग आहे. खरंतर पब्जीच्या मोबाईल व्हर्जनचा जगातला सर्वांत मोठा ग्राहकवर्ग भारतातच आहे. भारतात एकूण 25% गेमर्स आहेत. ज्या चीनीमध्ये हा गेम मोबाईलसाठी तयार करण्यात आला त्या चीनमध्येसुद्धा भारतापेक्षा कमी म्हणजे 17% गेमर्स आहेत. अमेरिकेत पब्जीचे 6% गेमर्स आहेत.

जगभरात गेमिंग उद्योग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. 2019 साली जगभरात गेमिंग उद्योगाची उलाढाल 16.9 अब्ज डॉलर्स इतकी होती. यापैकी 4.2 अब्ज डॉलर्सची उलाढालीसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका, जपान आणि त्यानंतर ब्रिटन आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक येतो. स्टॅटेस्टिका डॉट कॉमने ही आकडेवारी दिली आहे.

केंद्र सरकारने पब्जी गेमिंग अॅपवर बंदी घातल्यानंतर देशभरातल्या लाखो पब्जी फॅन्सची निराशा झाली. मात्र, हे अॅप पुन्हा एकदा भारतात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

चीनच्या टेन्सेन्ट गेम्स कंपनीकडे पबजीची भारतातली फ्रँन्चायजी होती. मात्र, यापुढे भारतातली फ्रँन्चायजी या कंपनीला न देण्याचा निर्णय PUBG Corporation या मूळ दक्षिण कोरियातल्या कंपनीने घेतला आहे. त्यासंबंधीचं एक पत्रकही कंपनीने प्रसिद्ध केलं आहे.

या पत्रकात PUBG Corporation ने म्हटलं आहे, “टेन्सेन्ट गेम्सकडे आता भारतातील पब्जी मोबाईल गेम हाताळण्याची जबाबदारी नसेल. गेमची सर्व जबाबदारी आता PUBG Corporation कडे असेल.”

केंद्र सरकारने सुरक्षा आणि देशाच्या सार्वभौमतेच्या कारणास्तव अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय आपण समजू शकतो, असंही कंपनीचं म्हणणं आहे.
पत्रकात कंपनीने म्हटलं आहे, “सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही संपूर्ण आदर करतो. खेळाडूंच्या डेटा सुरक्षेला कंपनीचं सर्वोच्च प्राधान्य आहे. भारतीय कायदे आणि नियम यांचं पूर्ण पालन करत गेमर्सना गेम पुन्हा एकदा खेळता यावा, यासाठी भारत सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा आम्हाला आशा आहे.”

का बंद केला PUBG …

माहिती तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं सांगत केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घातली आहे.

भारत सरकारने बंदी घातल्यानंतर PUBG Corporation ने टेन्सेन्ट गेम्स या चीनी कंपनीकडून भारताचे हक्क काढण्याची घोषणा केली आहे.

मूळ पब्जी गेम एक युद्ध गेम आहे. तो आधी कॉम्प्युटरसाठी डिझाईन करण्यात आला होता. दक्षिण कोरियाच्या PUBG Corporation या कंपनीने तो डिझाईन केला होता. मात्र, टेन्सेन्ट या चीनी कंपनीने या गेमचं मोबाईल व्हर्जन तयार केलं आणि चीन, भारत, अमेरिका यासह जगातल्या अनेक देशांमध्ये मोबाईलवर खेळण्यासाठीचे सर्व ऑपरेशन्स हीच कंपनी बघते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here