भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार

0

मुंबईः

देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु अशातच सोमवारी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.

जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारच बायोटेककडून देण्यात आली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळो करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.

भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या अगोदर कंपनीने प्रीक्लिनिकल अभ्यासामधून मिळविलेले निकाल सादर केले होते. मानवी वैद्यकीय चाचण्या पुढील महिन्यात देशभरात सुरू होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here