कोविडः ‘हेल्थ प्राईम नाशिक अॅपचे; पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

0

नाशिकः

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. जर दुर्दैवाने कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर सर्वसामान्य नागरिकांची धावपळ होत असते. संबंधित संसर्ग झालेल्या बाधिताला कोणत्या दवाखान्यात दाखल करायचे, तिथे कोणत्या प्रकारचे रुग्ण आहेत. या सर्व बाबींची माहिती आता सामाजिक बांधिलकीतून नाशिकच्या क्रेडाईने तयार केलेल्या ‘हेल्थ प्राईम नाशिक’ या अॅपमुळे एका क्लिकवर समजणार आहे. कोरोनाविरुद्धची लढाई लढताना महत्वाची माहिती मिळविण्यासाठी हे अॅप महत्वपुर्ण ठरेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अॅपच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

यावेळी दूरचित्रवाणी परिषदेत नाशिक महापालिका महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेविका समीना मेनन, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठक्कर, महापालिका नाशिक शहर नोडल अधिकारी डॉ.आवेश पलोड, महापालिका तांत्रिक विभाग प्रमुख हेमंत पाटील, क्रेडाईचे माजी अध्यक्ष उमेश वानखेडे, उपाध्यक्ष कुणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, सहसचिव अनिल आहेर, राजेश आहेर, अतुल शिंदे, मनोज खिवसरा, सुशील बागड, नरेंद्र कुलकर्णी, महापालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जगतजीत महापात्रा, विद्युत उपअभियंता शाम वाईकर वेब डेव्हलपर गौरेश सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले की, या अॅपमुळे बेडसची संख्या, आयसीयु बेड, पालिकेचे आरक्षण बेड, नॉन कोव्हीड बेडची आणि खाजगी बेड ची माहिती मिळणार असून रुग्णांची स्थिती, आजारानुसार रुग्णांचे वर्गीकरण यांची देखील माहिती यात असणार असल्याचेही श्री भुजबळ यांनी सांगितले. नाशिकच्या

नागरिकांसाठी क्रेडाई चांगली व्यवस्था निर्माण केली आहे मात्र,यावेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व दवाखान्यांमध्ये एक संपर्क अधिकारी नेमण्यात यावा. जेणेकरून नागरिकांना एकाच संबंधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करता येईल, तसेच पेशंट ला कुठल्या रुग्णालयात पाठवायचे आहे याबाबत मदत होईल असेही श्री.भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

कोरोनाविरुद्धची लढाई लढताना शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र ही लढाई जिंकण्यासाठी नाशिक मधील सामाजिक संस्थांनी देखील सामाजिक बांधिलकी म्हणून जबाबदारी उचलायला हवी, असे आवाहन करत क्रेडाईने उचललेले हे पाउल अत्यंत कौतुकास्पद असून नाशिकच्या नागरिकांसाठी चांगली व्यवस्था निर्माण केल्याबद्दल क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांचे श्री. भुजबळ यांनी आभार मानले.

यावेळी महापालिका महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. यामध्ये क्रेडाईने महत्वाची भूमिका बाजवली असून नाशिककरांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल असे पाउल उचलले आहे. त्यामुळे क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here