भारताचं ट्रम्प यांना उत्तर ! चीन आणि आम्ही बघून घेऊ, मध्यस्थाची गरज नाही !

0

नवी दिल्ली –

भारत आणि चीन शांततापूर्ण मार्गाने या मुद्द्यावर उत्तर शोधेल. आम्ही चीनशी चर्चा करत आहोत, अशी भूमिका भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली. भारत-चीनमधील सीमा वादावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थता करण्याची तयारी दाखवली. यानंतर भारताने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या प्रकरणी कोणत्याही मध्यस्थाची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे .

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नेपाल आणि चीनसोबतच्या सध्याच्या संबंधांवर माहिती दिली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “भारत आणि नेपाळचे संबंध घनिष्ठ आहेत. कोरोना महामारीच्या काळातही आम्ही विना परवाना व्यापार सुनिश्चित केला आहे. आम्ही सीमा प्रश्नावर नेपाळमध्ये जी स्थिती आहे त्यावर लक्ष ठेऊन आहोत. परस्पर समंजसपणा आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन भारताचे दरवाजे नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांसाठी खुले राहिले आहेत.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत म्हटले होते, “अमेरिका भारत आणि चीनमधील सीमा वादात मध्यस्थता करण्यास तयार आहे. आम्ही भारत आणि चीन दोन्ही देशांना याबाबत कळवले आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार आहे.” दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव तयार झाला असताना देखील अशाचप्रकारे मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. तेव्हा देखील भारताने काश्मीर भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत यात मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here