आज भारत बंद! देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार…

0

नवी दिल्ली l संसदेत नुकतेच पारित करण्यात आलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांकडून आज देशात भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या विरोध प्रदर्शनात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याशिवाय देशातील 31 शेतकरी संघटनांनी या बंदला समर्थन दिलं आहे

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या दाव्यानुसार, देशभरातील छोट्या-मोठ्या 250 शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होतील.

आतापर्यंत पंजाब आणि हरियाणा आंदोलनाचं केंद्र होतं. मात्र, आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहारमधील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होतील.

देशातील विविध शेतकरी संघटनांनी मिळून आजची म्हणजेच 25 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. मात्र, पंजाबमध्ये कालपासूनच (24 सप्टेंबर) आंदोलन तीव्र झालंय. काल पंजाबमध्ये रेल्वे रोखण्यात आली. अनेक रेल्वे रुळवांवर शेतकरी आडवे झोपले होते.

कृषी विधेयकाविरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यात पूर्ण शट डाऊन करण्यात आलं आहे. तर पंजाबमध्ये शेतकरी रेल रोको आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here