माणुसकी संपली ! कोणी जवळ येईना म्हणून पतीचा मृतदेह एकटीने हातगाडीवरुन नेऊन पत्नीने अंत्यसंस्कार केले !

0

बेळगाव l कोरोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी चार जण लागतात, पण कोरोनाच्या दहशतीमुळे चार लोक देखील येईना झाले आहेत. रात्री झोपेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी, नातेवाईक यांनी पाठ फिरवली. शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या अथणी गावात शुक्रवारी पाहायला मिळाली.

अथणी येथील सदाशिव हिरट्टी (वय 55 वर्षे) यांचा गुरुवारी (16 जुलै) रात्री मृत्यू झाला. सदाशिव यांचे अथणी येथील रुग्णालयाच्या समोर चप्पल दुकान होते.शुक्रवारी (17 जुलै) सकाळी सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी, नातेवाईक यांना समजली. बातमी समजताच शेजारी, नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दूर उभं राहूनच अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले. मृतदेह तिथेच राहिला.शेवटी सदाशिवच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला. मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली.

त्या दुःखी पत्नीने हातगाडीवर मृतदेह उचलून ठेवला. नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला. सगळे बघत राहिले पण एकही जण त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला आला नाही. शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here