breadcrumb-details

बीड जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Gallery

बीड जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

वेगवान न्यूज / केशव मुंडे
24 March 2021 07:39 PM

बीडः

जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश दिनांक 26 मार्च 2021 पासुन ते 4 एप्रिल 2021 या कालावधी पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.

       वरील कालावधीत सक्षम अधिकारी यांचे  परवानगी शिवाय बीड जिल्हयात  प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून बीड जिल्हयात  येणाऱ्या सर्व सिमा सिल, बंद करण्याचे निर्देश श्री. रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत. या मधून नियमानुसार न्यायिक आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह  मुभा देण्यात आलेल्या काहींना  वगळण्यात आले आहे.

    राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13-3-2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड -19 नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या लागू करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे.

      कोरोना विषाणूचे (कोविड-19) उद्भवणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियत्रंण यासाठी महाराष्ट्र कोविड-19, उपाययोजना नियम 2020 यातील नियम 3 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केलेले आहे आणि त्यांना कार्यक्षेत्रातील कोविड -19 वर नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील.

      वरील आदेशाचे पालन न करणारी,उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा समुह यांनी साथरोग  प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार गुन्हा केला असे मानन्यात येईल  व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.