मुंबई l राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या चार क्षेत्रांशी संबंधित १२ मान्यवरांची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी चार जणांना संधी मिळणार असून शिवसेनेच्या वतीने आश्चर्यकारकरित्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली आणि त्यानंतर उर्मिला यांनीही शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यास होकार दर्शवला आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेने नेमकी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाला का पसंती दिली, यावरही तर्क लावले जाऊ लागले आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी यांसदर्भात बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले, उर्मिला यांनी यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. शिवाय त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडी सरकारने 12 जणांच्या नावांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केलीये. यामध्ये एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आलीये.