ड्रग्ज प्रकरण : बॉलिवूडच्या ‘या’ बड्या अभिनेत्रींचं नाव आले समोर!

0

मुंबई l नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बॉलिवूड ड्रग्स केसचा तपास करत आहे. या प्रकरणात दीपिका पदुकोणचे एक मोबाइल चॅट समोर आले आहे. यात दीपिका क्वान (KWAN) टॅलेंट मॅनजमेंट कंपनीच्या करिश्मासोबत चर्चा करत आहे. दोघी ड्रग्स संदर्भात बोलत असल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच दीपिकाला समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंग राजपुत मृत्यू प्रकरणाशी निगडित ड्रग्ज प्रकरणात आता श्रद्धा कपूर, सारा अली खानसह दीपिका पदुकोण हिचे नावही समोर आले आहे. पैकी श्रद्धा आणि साराला याच आठवड्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (एनसीबी) चौकशीला बोलावले जाऊ शकते, असे मानले जाते.

सुशांतची प्रेमिका रिया चक्रवर्ती हिने चौकशीत श्रद्धा आणि साराची नावे घेतली आहेत. दुसरीकडे, रिया हिची मॅनेजर जया साहा हिची सोमवारी चौकशी झाली. तिच्यासह व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर ‘डी’ आणि ‘के’ नावाने ड्रग्जसंदर्भात बोलणे झाल्याचे समोर आले आहे. ‘डी’ नावाने बोलणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण असल्याचे मानण्यात येत असून, ‘के’ नावाने 2000 मधील आघाडीची अभिनेत्री बोलत असल्याचे समजले जात आहे. ‘डी’ला काहीही करून ‘माल’ (ड्रग्ज) हवा आहे… आणि ‘के’ तिच्यासाठी त्याची तजवीज करणार आहे, असे या संवादातून समोर आलेले आहे. ऑक्टोबर 2017 मधील हा संवाद आहे.

टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रद्धा कपूर यांचेही एक चॅट तपास पथकाच्या हाती आले आहे. जया साहा मोबाइल चॅटमध्ये एस (S), डी (D), के (K), एन (N) या सांकेतिक नावांनी बॉलिवूडमधील सेलिब्रेटींशी चर्चा करत असल्याचे दिसत आहे. यातील एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि डी म्हणजे बॉलिवूडची सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री आणि करण जोहरच्या पार्टीत दिसलेली दीपिका असल्याचा संशय व्यक्त होत आहे. के ही ९०च्या दशकातील मेगा स्टार आणि एन नावाची व्यक्तीही बॉलिवूड सेलिब्रेटी असल्याचे वृत्त आहे. महत्त्वाचे म्हणजे सुशांतसोबत रिया चक्रवर्ती तसेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनी अभिनय केला आहे. त्यामुळे श्रद्धा आणि सारा यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी तपास सुरू असताना हाती आलेल्या मोबाइल चॅटमधून ड्रग्स केसला सुरुवात झाली. या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह अनेकांना अटक झाली आहे. लवकरच बॉलिवूडमधील दिग्गजांची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा या दोघांची सोमवारी कसून चौकशी केली. दरम्यान, ‘एनसीबी’ या आठवड्यात सारा, श्रद्धा, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिम्मोन खंबाटा यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यापूर्वी तिचा नोंदविलेल्या जबाब आणि व्हॉटस् अ‍ॅप चॅटमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे श्रुती आणि जयाकडे ‘एनसीबी’ कसून चौकशी करत आहे. अभिनेत्री सारा अली खान आणि फॅशन डिझायनर सिम्मोन खंबाटा यांचे ड्रग्ज डिलर्ससोबत थेट संबंध आहेत. साराचा स्वतःचा एक ड्रग्ज पेडलर आहे. रियाचा तिच्या ड्रग्ज पेडलरसोबत संपर्क होत नसल्यास सारा तिला आपल्या ड्रग्ज पेडलरकडून ड्रग्ज पुरवत होती.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव दीपेश सावंत आणि जगदीश बोटवाला यांच्या चौकशीतून समोर आले आहे. तिचा या मृत्यू प्रकरणाशी किंवा ड्रग्ज डिलर्ससोबत थेट संबंध असल्याचे समोर आले नसले, तरी ‘एनसीबी’ तिच्याकडे चौकशी करणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here