नवी दिल्ली l आइस्क्रीम बनविणाऱ्या क्वॉलिटी लिमिटेडच्या दिल्ली, बुलंदशहर, सहारनपूर, अजमेर, पालवाल या ठिकाणी सीबीआयने सोमवारी धाडी घातल्या.आइस्क्रीम बनविणाऱ्या क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीवर १४०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका गटाने तक्रार दाखल केली होती.
क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक संजय धिंग्रा, सिद्धांत गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांचे तसेच आणखी काही लोकांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली होती. त्यानुसार सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे.
बँकेचा पैसा अन्यत्र वळविणे, बनावट कागदपत्रे, पावत्या तयार करणे, खोट्या मालमत्ता दाखविणे असे अनेक गैरव्यवहार क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीकडून झाल्याचे बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील काही बँकांच्या गटांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
बँक आॅफ इंडियाशिवाय या बँकांच्या गटात कॅनरा बँक, आंध्र बँक, बँक आॅफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे.क्वालिटी कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याचा जो आरोप आहे, त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने देशभरात काही ठिकाणी घातलेल्या धाडींमध्ये नेमके कोणते पुरावे सापडले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
या सगळ्या प्रकरणाबाबत क्वॉलिटी कंपनीने आपली भूमिका अद्याप प्रसारमाध्यमांकडे मांडलेली नाही.
क्वॉलिटी कंपनीच्या संचालकांनी जो गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे, त्या कृत्यांमध्ये त्यांना आणखी कोणी कोणी साथ दिली त्याचीही चौकशी सीबीआय करणार आहे.