नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांना रेल्वे बंदचा फटका

0

नाशिक: नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून काल तर 220 पर्यंत कोरोना पाॅझटिव्ह आढळून आल्यामुळे प्रशासनापुढे मोठी अडचण होऊन बसली आहे तर दुसरीकडे रेल्वे तसेच बस वाहतूक बंद असल्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  चाकरमान्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत.  यात महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी नाशिकला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे .तर काहींना आपल्या कंपन्यांमधील चांगली नोकरी गमवावी लागली आहे.

मनमाडहून दररोज लासलगांव, निफाड, नाशिक, कल्याण आणि मुंबई येथे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या नोकऱ्या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी, शटल बंद असल्याने धोक्यात आल्या आहेत. र्निबध शिथील झाल्यानंतर इच्छितस्थळी कामावर दररोज पोहचण्यासाठी चाकरमान्यांचा खिसा खाली होत आहे.

राज्यराणी आणि मनमाड-इगतपुरी शटल या महत्वाच्या गाडय़ा तीन महिन्यांपासून बंद असल्याने चाकरमाने, व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांचे अतोनात हाल सुरू आहेत. मनमाड वरुन सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस आणि त्याचबरोबर पंचवटी एक्स्प्रेस बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होऊ लागली आहे.

नाशिक, मुंबई-पुण्यासह विविध भागात करोना आजाराचा संसर्ग वाढत असला तरी शासकीय आणि खासगी कार्यालयात टप्प्याटप्प्याने आवर्तन पध्दतीने काम सुरू झाले आहे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसेल तर वेतनही कापले जात आहे.

रेल्वेअभावी दोन हजार जण घरी

नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, लासलगांव परिसरांतून नाशिकला तसेच मुंबईला नोकरी आणि विविध व्यवसाय उद्योगांसाठी सुमारे दोन हजार नागरिक ये-जा करतात. पण ते सर्व सध्या घरी आहेत. खासगी वाहतूक लपून छपून सुरू असली तरी त्यांचे दर परवडणारे नाहीत. आणि दुचाकीवर एवढय़ा लांबचा प्रवास, दररोज जाऊन येऊन शक्य नाही. इंधन दरवाढीमुळे तो आर्थिकदृष्टय़ा परवडणाराही नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here