शेतकऱ्याने कर्ज फेड करून सुद्धा स्टेट बँक लासलगाव शाखेकडून तगादा !

0

वेगवान न्यूज / समीर पठाण
लासलगाव l राष्ट्रीयकृत म्हणून नावाजलेली बँक म्हणून भारतीय स्टेट बँकेची गणना केली जाते.लासलगाव येथील भारतीय स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांची अरेरावी प्रकरण ताजे असतानाच सावरगाव तालुका निफाड येथील शेतकऱ्याने कर्जाची रक्कम ३ लाख ५० हजार रुपये भरलेले असताना व बॅंकेने कर्ज फेड केल्याचा दाखला दिलेला असतानाही पुन्हा कर्ज भरण्याचा तगादा बँकेने सुरू केल्या असल्याने वैतागलेल्या या शेतकऱ्याने बँकेत अपहार झाल्याची तक्रार बुधवारी दाखल केली आहे.

दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने दिंडोरीच्या खा. भारती पवार यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे प्रकरण अगदी ताजे असतानाच बुधवारी निफाड तालुक्यातील सावरगाव येथील संजय कुशारे यांनी बँकेत ३ लाख ५० हजार रुपये आपला मुलगा गणेश कुशारे याने कर्ज काढलेले होते. त्या कर्जाची परतफेड बँकेचे कृषी अधिकारी होन साहेब यांच्याकडे केल्यानंतर या कृषी अधिकाऱ्याने कर्ज परतफेड केल्याचा दाखला या शेतकऱ्याला २०१८ या वर्षी दिलेला ही आहे. शिवाय बँकेच्या लेटरहेडवर तलाठी सावरगाव यांना कर्ज कमी करण्यासंदर्भात पत्रही ही दिलेले आहे.

कर्ज फेड केलेली असताना तशा प्रकारचे बँकेने दाखले दिलेले असतानाही आपण कर्ज भरले नसून तातडीने कर्ज भरण्याचा तगादा या बँकेकडून इतर कर्जदारांच्या द्वारे निरोप पाठवून सुरू झाल्यावर आपण भरलेल्या रकमेचा काहीतरी अपहार झाल्याचे तक्रारदार संजय कुशारे यांच्या लक्षात आले. संजय कुशारे यांनी या अपहार प्रकरणी भारतीय स्टेट बँकेच्या लासलगाव शाखेत गेल्या आठ दिवसांपासून चार ते पाच वेळा चकरा मारल्या त्या वेळी तत्कालीन कृषी अधिकारी असलेले होन साहेब यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली असून आता उपस्थित असलेले अधिकारी कानावर हात ठेवून झालेल्या प्रकाराबद्दल माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

काबाड कष्ट करून शेतकरी आपल्या शेतात पीक पिकवतो त्या उत्पन्नातून तो काढलेले कर्ज कसेबसे भरतो कर्ज भरूनही शेतकऱ्याच्या वाटेला अशाप्रकारे बँकेत भरलेल्या पैशाचा अपहार होऊन मनस्ताप होत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.संबंधित शेतकरी संजय कुशारे यांनी या तक्रारीच्या निवेदनाच्या प्रती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, दिंडोरी खासदार भारती पवार, स्टेट बँकेचे झोनल अधिकारी व नाशिकचे जिल्हाधिकारी यांना पाठवल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here