मुंबई l आरसीबीच्या १६३ धावसंख्येचा पाठलाग करताना मजबूत स्थिती असतानाही हैदराबादचा डाव १५३ धावांत संपुष्टात आला. हैदराबादने हा सामना तर गमावलाच, मात्र त्याचवेळी स्टार अष्टपैलू खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे आता त्यांच्या चिंतेत भरही पडली आहे.रोमांचक झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मोक्याच्या वेळी कच खाल्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध हातातील सामना गमवावा लागला.
या सामन्यात हैदराबादला मोठा धक्का बसला तो स्टार अष्टपैलू मिशेल मार्शच्या दुखापतीचा. गोलंदाजी करताना पायाची टाच दुखावल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. मात्र आता मार्शची दुखापत अत्यंत गंभीर असल्याची माहिती हैदराबाद संघाच्या सूत्राकडून मिळाली आहे.
यामुळे आता त्याला आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांतही खेळता येणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या घसरगुंडीची अधिक चर्चा झाली. आरसीबीने सामना जिंकण्यापेक्षा हैदराबादने त्यांना विजय बहाल केला असेच चाहते म्हणत आहेत.
आरसीबीच्या डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने चेंडू मार्शकडे सोपविला. यावेळी दुसऱ्या चेंडूवर अॅरोन फिंचने मारलेला ड्राईव्ह फटका अडविण्याच्या प्रयत्नात मार्शच्या पायाची टाच दुखावली गेली.
यानंतरही त्याने दोन आणखी चेंडू टाकले. चौथा चेंडू टाकल्यानंतर मात्र त्याची दुखापत उफाळून आली आणि त्याला मैदान सोडावे लागले. यानंतर तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीलाही आला, परंतु यावेळी त्याला नीट उभेही राहता येत नव्हते.
एका वृत्तस्थळाच्या हवल्यानुसर,’मार्शची दुखापत गंभीर असल्याचे दिसत आहे. मी नक्की सांगू शकत नाही, पण यातून जर का तो सावरला नाही, तर मात्र त्याला उर्वरीत सामने खेळता येणार नाही.’ तरी अद्याप हैदराबाद संघाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
जर मार्श संघाबाहेर झाल्यास हैदराबादसाठी हा खूप मोठा धक्का असेल. मार्शला आपल्या कारकिर्दीत सातत्याने दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. मार्श संघाबाहेर गेल्यास हैदराबाद बदली खेळाडू म्हणून 37वर्षीय डॅन ख्रिस्टियन याला संघात स्थान देण्याही शक्यता आहे.