मोठी बातमी ! लडाखमधील तणाव निवळणार ? “या” सूत्रावर सहमती…

0

मॉस्को,नवी दिल्ली l चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर आलेले भारत आणि चीने सैन्य यामुळे लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशैंमध्ये एकमत झाले आहे.

लडाखमधील सीमेच्या सद्यस्थितीत बदल करण्याचा चीनने कोणताही प्रयत्न केल्यास, त्याकडे कानाडोळा केला जाणार नाही, असे जयशंकर यांनी वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितले. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. दोघे तिथे शांघाय सहकार संघटनेत सहभागी होण्यासाठी ते रशिया दौऱ्यावर होते.

कोणत्या पाच मुद्द्यांवर भारत-चीनमध्ये सहमती?

1. भारत-चीन सीमेवरील सर्व विद्यमान करार आणि प्रोटोकॉलचे पालन दोन्ही बाजूंनी केले पाहिजे, सीमाभागात शांतता राखली पाहिजे आणि तणावात वाढ होणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे.

2. भारत-चीन सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधीमार्फत संवाद सुरु ठेवण्यावरही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत-चीन सीमाप्रश्नावरील सल्लामसलत व समन्वय कार्य मंडळानेही आपली बैठक चालू ठेवली पाहिजे.

3. तणावपूर्ण परिस्थिती जसजशी कमी होईल, तसे सीमाभागात शांतता राखण्यासाठी, एकमेकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना वेगाने हाती घेतल्या जाव्यात, यावरही सहमती झाली.

4. मतभेदांचे रुपांतर वादात होऊ न देण्यासह भारत-चीन संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी आपापल्या नेत्यांचे मार्गदर्शन घ्यावे, यावर दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले

5. सीमावर्ती भागातील सद्यस्थिती कोणत्याही बाजूच्या हिताची नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सीमेच्या सैन्याने आपला संवाद सुरु ठेवावा, मात्र योग्य अंतर राखावे आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here