वेळीच सावधान व्हा ! ना पेटीएम, ना इंटरनेट बँकिंग तरीही खात्यातून पैसे गायब !

0

नवी दिल्ली – भारतात डिजिटल पेमेंट पद्धतीने व्यवहार करण्यास प्राधान्य दिलं जात आहे. मात्र ऑनलाईन व्यवहार करताना अथवा डिजिटल पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता ही अधिक असते.

आपला ओटीपी, पासवर्ड कोणालाही सांगू नका असे मेसेज हे बँकांकडून सातत्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी येत असतात. मात्र आता बँकिंग फ्रॉडमध्ये नानाविध शक्कल लढवून लोकांना जाळ्यात अडकवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. खरेदीपासून ते बिल भरण्यापर्यंतचे अनेक व्यवहार हे ऑनलाईनच केले जातात. कॅशलेस व्यवहारांना अधिक पसंती दिली जाते. आता इंटरनेट बँकिंग नाही, पेटीएम अकाऊंट नाही, बँकेकडून कोणताही मेसेज अथवा ओटीपी आला नाही तरीही अकाऊंटमधून पैसे कट झाल्याच्या अनेक घटना या सध्या समोर येत आहेत.

त्यामुळे नागरिकांनी अशा फ्रॉडपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. शहाब शेख यांचं येस बँकेत अकाऊंट आहे. शहाब शेख यांना येस बँकेचा फोन आला आणि तुमच्या पेटीएम अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झाल्याचं सांगण्यात आलं. हे ऐकून शहाब यांना धक्का बसला कारण त्याच्याकडे पेटीएम अकाऊंट नाही आणि ते इंटरनेट बँकिंगचाही वापर करत नाही.

तसेच त्यांना या संदर्भात कोणताही मेसेज देखील आला नाही.11 जुलै ते 16 जुलै या कालावधीत तब्बल 11 वेळा पेटीएमच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठविण्यात आले. आतापर्यंत एकूण 42,368 रुपये पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी याबाबत लगेगच बँकेकडे चौकशी केली. तेव्हा बँकेने त्यांना तुमचीच चूक असल्याचं सांगितलं आहे. तसेच कोणाला तरी तुम्ही तुमचे बँकेच्या अकाऊंटसंबंधित तपशील दिल्याचं देखील सांगितलं आहे. शहाब शेख यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.

कसा कराल ऑनलाईन फ्रॉडपासून बचाव

इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरताना मोठी काळजी घेतली पाहिजे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.सध्या अशा बर्‍याच घटना समोर येत आहेत. आरबीआय नेहमी वेळोवेळी याबाबत सावधगिरी बाळगते.

– सार्वजनिक वाय-फाय किंवा इंटरनेट नेटवर्कद्वारे कधीही बँकिंग व्यवहार करू नका.

– बँकिंग खाते नेहमी मोबाईल नंबरसह अपडेट करा आणि डेबिट कार्डचा सीव्हीव्ही, नंबर किंवा पिन सारख्या गोष्टींचा तपशील मोबाईलमध्ये ठेवू नये.

– कोणालाही कधीही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील देऊ नये.

– आपण पेमेंट अ‍ॅप वापरत असल्यास, सावधगिरी बाळगा. पेमेंट अ‍ॅपला जास्त अधिकार देऊ नका.

– ऑनलाईन व्यवहारासाठी वेगळं अकाऊंट ठेवणं चांगलं आणि त्यामध्ये चार किंवा पाच हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम ठेवू नये. आपलं मुख्य बँक अकाऊंट इंटरनेटशी जोडू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here