आता मी टेन्शन फ्री झालो, “भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती” – एकनाथ खडसे

0

नाशिक l भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मी टेन्शन फ्री झालो आहे, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधता एकनाथ खडसे यांनी हे विधान केलं आहे.

माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतंच प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांनी दिला. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल, याची नेहमी भीती असायची, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

‘मागच्या कालखंडात गेले चार वर्षे मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल. कधी विनयभंगासारखी केस दाखल केली जाईल, याची नेहमी भीती असायची. मात्र आता मी त्या केसमधून निर्दोष सुटलो आहे. विनयभंगासारख्या खटल्यातूनही बाहेर आलो आहे.’

‘या सर्वातून बाहेर आल्याने माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. आता एनसीपीत आलो. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे,’ असा इशारा एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला.

‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कुल्फी आणि चॉकलेट देऊन भाजपात प्रवेश दिला. भाजपातील अनेक आमदार माझ्या संपर्कात आहे. मात्र पक्ष बंदी कायद्यामुळे अनेक जण अडचणी आहेत. मला साधा कार्यकर्ता म्हणून काम करायला मला आवडेल,’ असेही एकनाथ खडसे म्हणाले.

‘भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी भटांचा पक्ष असेही म्हणायचे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. ही ओळख गोपीनाथ मुंडे, मी, नितीनजी, प्रमोदजी, अण्णा डांगे यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. बहुजन चेहरा करण्याचा प्रयत्न केला. मी 2014 नंतर बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालं आहे हे मान्यचं करावं लागेल,’ असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या या दाव्यानंतर नेमके कोणते माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या वृत्तावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here