बिहारमध्ये एका दिवसात वीज कोसळून तब्बल 83 जणांचा मृत्यू

0

पटना l बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घेटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली आहे. सध्या राज्यातील वातावरण खराब असल्याने कुणीही घरातून निघू नये, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.बिहारमधील या नैसर्गिक संकटात गेलेल्या बळींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. “बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड पाऊस आणि वीज पडल्याने अनेक नागरिकांचं निधन झालं आहे. राज्य सरकारकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घचनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबायांप्रती मी संवेदना व्यक्त करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

”बिहारमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने आज 83 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो. देव त्या सर्वांच्या आत्म्याला शांती देवो. मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत तात्काळ पोहचवावी.” – राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here