नाशिक जिल्ह्यात विज चोरीप्रकरणी 47 जणांवर गुन्हा दाखल…

0

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
दहिवड l तालुक्यातील विजेच्या लाईनवर आकडे टाकून व विद्युत मीटरमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून वीज वापर करणार्या एकूण ४७ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती देवळा तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता राजेश हेकडे यांनी दिली आहे.

नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता श्री. रंजना पगारे यांच्या आदेशानुसार व मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत शाखा अभियंत्यांची ५ पथके स्थापन करण्यात आली व या पथकाद्वारे ० युनिट, १-३० युनिट वीज वापर असलेल्या, तसेच कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या एकूण २१०५ वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली. विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६,१३५ व १३८ नुसार अनधिकृतपणे वीज वापर करणार्या एकूण ७७ जणांनी ४११७० युनिटची वीजचोरी करून महावितरणचे ५.५७ लाख रुपयाचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले आहे. या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना वीज चोरीची बिले देण्यात आली आहे.

त्यापैकी १९ जणांनी दंडाची रक्कम २.३२ लाख इतकी भरणा केली आहे. दंड न भरणाऱ्यांवर पोलीसात गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेत संदीप वराडे, राकेश महाजन, जितेंद्र देवरे, महेंद्र चव्हाण, रविंद्र खाडे या शाखा अभियंत्यासह ५० जनमित्र यांनी मोहिमेत भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here